बोंबील फ्राय | बोंबील फ्राय रेसिपी | Crispy Bombay Duck Fry | Easy And Quick Starter Bombil Fry
Автор: Aarti Food Lover
Загружено: 2021-04-24
Просмотров: 5988
Описание:
बोंबील रवा फ्राय ” हा पदार्थ कोणत्याही महाराष्ट्रीयन किंवा कोकणी सीफुड स्पेशल हॉटेलमधील मेनूचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं तरी वावगे ठरणार नाही !
हॉटेल मॅनॅजमेण्टच्या पुस्तकात ज्याला आपण स्टार डिश म्हणतो ना कि जिचा खप हा नेहमी उच्चांक गाठत असतो तेच हे रव्यामध्ये घोळवलेले कुरकुरीत तळलेले बोंबील! आता ह्याला स्टार डिशचा दर्जा का बरं, एकतर बोंबलाचा काटा निघाला तरी ठीक , नाहीतर चावून खाल्ला तरी ठीक , म्हणून खायला अगदी सेफ हां ! दुसरे म्हणजे हॉटेलात तळीराम मित्रांबरोबर जर अड्डा जमवायचा असेल तर हा कुरकुरीत तळलेला मासा अगदी मस्त चखणा म्हणून सर्व केला जातो ! बरं याच्या लई तऱ्हा , नुसत्या तांदळाच्या पिठात घोळवून तळा , बेसनात लपेटून तळा किंवा अगदी तिखट ठेचा भरून भरला बोंबील बनवा, हा उत्कृष्टच लागतो !
आता माझे हे बोंबलाचे कौतुक वाचून काहीजण नाकही मुरडतील , म्हणतील ” किती तो मासा बुळबुळीत , शिजवायला लागले कि सरासरा पाणी सुटायला लागून पसरायला लागतो !” खरं आहे हे , परंतु बोंबलाच्या या गुणधर्मावर मात करून त्याच्या चवीचा आनंद घेणे म्हणजे अस्सल खवय्यांसाठी आव्हानच ! कोकणात एक माणूस नाही गावायचा ज्याला बोंबलाशी नडते आहे ! अहो , तळलेला बोंबील कधी साध्या वरण भाताबरोबर खाऊन बघा , सुख म्हणजे नक्की काय असते या प्रश्नाचे उत्तर मिळेल तुम्हाला ! मुंबईला शिवडीच्या मासळी बाजारात ओल्या बोंबलाचे वाटे डोळ्यांसमोर हातोहात खपले जाताना मी पाहिलेत आणि बाबाला बोंबील नाही मिळाल्यावर मी भोकांड पसरलेलेही आठवतेय मला !
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : २0 मिनिटे
किती जणांना पुरेल : 4 ते 5
साहित्य :
5 मोठ्या आकाराचे बोंबील = ७०० ग्रॅम्स
1 टीस्पून हळद
१ लिंबाचा रस
३ हिरव्या मिरच्या
७-८ लसणीच्या पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा
तेल
३/४ कप = १५० ग्रॅम्स रवा
१/२ कप = ७५ ग्रॅम्स तांदळाचे पीठ ( गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ सुद्धा वापरले तरी चालेल )
४ टेबलस्पून मालवणी मसाला ( मालवणी मसाला नसेल तर ३ टेबलस्पून लाल मिरची पूड + १ टेबलस्पून गरम मसाला वापरावा )
मीठ
कृती:
सर्वप्रथम बोंबील नीट साफ करून त्यांना पोटाच्या भागाकडून मध्यभागी चीर देऊन ते उघडून घ्यावेत. बोंबील साफ करण्याची कृती व्हिडिओमध्ये पाहून घ्यावी. जर घरी शक्य नसेल तर मासे विक्रेत्याकडून बोंबील साफ करून घ्यावेत.
स्वच्छ पाण्याने धुऊन बोंबील एका कोरड्या फडक्याने कोरडे करून घ्यावेत. बोंबलाला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळून लावावा आणि १० मिनिटे मुरत ठेवावेत.
१० मिनिटांनंतर आपण बोंबील चेपणीला घालून घेऊ. बोंबलामध्ये खूप जास्त पाणी असते आणि ते काढल्याशिवाय बोंबील चुरचुरीत तळले जात नाहीत. एका कापडावर बोंबील ठेवून वरूनही एक कापड घालावे. त्यावर एक चॉप्पिंग बोर्ड किंवा कुकर किंवा पाट्यासारखी वजनदार वस्तू ठेवून ३० मिनिटे चेपणीला घालावेत.
आता आपण बोंबलांना लावण्यासाठी आले लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा जाडसर ठेचा वाटून घेऊ. पाणी फार कमी वापरून मसाला वाटावा. मी १ टीस्पून पाणी वापरले होते.
३० मिनिटांनंतर बोंबलामधील पाणी कमी होऊन ते एकदम सपाट होतात . वर वाटलेला ठेचा त्यांना लावून फ्रिजमध्ये १० मिनिटे ठेवावेत . असे केल्याने बोंबील छान चुरचुरीत तळले जातात .
बोंबलांना तळण्यापूर्वी घोळवण्यासाठी एका ताटलीत मालवणी मसाला, रवा , तांदळाचे पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यावे. बोंबील फ्रिजमधून बाहेर काढून ते या मिश्रणात चांगले घोळवून घ्यावेत.
एका लोखंडी किंवा नॉनस्टिक तव्यात २-३ टेबलस्पून तेल मोठ्या आचेवर गरम करून घ्यावे. मंद ते मध्यम आचेवरच आपण मासे तळणार आहोत. जर तेल चांगले तापले नाही तर मासे तव्याला चिकटून तुटतात .
घोळवलेला मासा तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यावा. माशाची एक बाजू कुरकुरीत तळायला जवळजवळ ३ मिनिटे लागतात !
बोंबील तळायला थोडे जास्त तेल लागते म्हणून व्यवस्थित तेल घालून बोंबील तळून घ्यावेत.
हे चविष्ट , कुरकुरीत बोंबील कितीही खाल्ले तरी मन भरत नाही !
#Bombilfry
#Bombilravafry
#Bombilmasalafry
#Aartifoodlover
#Maharashtrafood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: